बीडमध्ये बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नवव्या लग्नाच्या वेळी बिंग फुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिह्यातील मंगळवेढ्यात बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. आता असाच प्रकार बीडमध्ये उघड झाला आहे. या लग्न घोटाळ्यातील तरुणी आठ वेळा लग्न करून नवव्या लग्नासाठी बोहल्यावर चढली होती. तिने तरुणाचे लाखो रुपये लुटले. या प्रकरणी नवरीसह एजंटला अटक झाली आहे.
बीडच्या उमापूर गावातील हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

ग्रामीण भागातील विवाहोच्छुक तरुणांना लक्ष्य करून त्यांना मुलगी दाखवली जायची. ‘एक नवरी आणि नऊ नवरे’ असाच हा प्रकार आहे. गावातील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली. एकाच मुलीचे अगोदर आठ नवरदेवांसोबत लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर येथील नवव्या नवरदेवासोबत एजंटकडून लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, हे लग्न जुळवण्यासाठी नवऱ्या मुलाकडून लाखो रुपये घेतले होते. याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पीडित नवरदेव योगेश शिंदे याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणी आणि एजंटला अटक केली.