
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण शहरातील राजपाल बार मध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन गटांत सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये एकावर चाकूने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. उरण पोलीस ठाण्यात याबाबत भा.द.वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून घोण्या गँगच्या दोघांना अटक केली आहे.
उरणमधील कुविख्यात घोण्या गँग आणि विन्या गँगचे गुंड सोमवारी उरण शहरातील राजपाल बार मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळेस त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी रोशन उर्फ घोण्या याने विन्या गँगच्या विनेश शांताराम पेडेकर याच्यावर सुऱ्याने वार केले. यामध्ये विनेश उर्फ विन्याच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे. सध्या त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.
घोण्या गँग आणि विन्या गँग हे या परिसरात डिझेल तस्करीचा धंदा करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे आपसात फाटले होते. त्यातूनच हा राडा झाला असल्याचे बोलले जाते. या राड्यानंतर राजपाल हॉटेल आणि राजपाल नाका परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. तर हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांची पळता भूई थोडी झाली. या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याला मिळताच उरण पोलीसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून रोशन रमाकांत शिरोडकर उर्फ घोण्या आणि अभिषेक प्रदिप चालके यांना अटक केली आहे. याबाबत फिर्यादी सुचित महादेव कोळी आणि विनेश शांताराम पेडेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या गुन्ह्या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व्ही.जी.कराड हे अधिक तपास करत आहेत.


































































