कुख्यात गुंड नीलेश घायवळ सध्या जामखेड मतदारसंघात महायुतीच्या अनेक कार्यक्रमांत उजळ माथ्याने फिरत आहे. जामखेडमध्ये नागपंचमी यात्रेनिमित्त आमदार प्रा. राम शिंदे व नीलेश घायवळ हे अनेक कार्यक्रमांत एकत्रित फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
‘बॉस’ नावाने प्रसिद्ध असलेला पुणे शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे एकत्रित दिसले. जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेनिमित्त हे दोघे एकत्र आले होते. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. गुंड नीलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुंड घायवळ आणि आमदार राम शिंदे जामखेडमध्ये एकत्र आल्याने चर्चा सुरू आहे.
गुंड घायवळ याच्यावर पुण्यात 25पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गुंड घायवळ ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता घायवळ आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार प्रा. राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ आहेत.