चाकरमान्यांची लगबग, एसटीच्या जादा गाड्यांचे बुकिंग फुल्ल

गणपती सणाला कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रेल्वेचे तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश चाकरमानी एसटीकडे वळले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या जादा गाडय़ांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत नियमित गाडय़ांव्यतिरिक्त 478 जादा बसगाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तसेच 136 जादा गाडय़ांचे बुकिंग एक-दोन दिवसांत फुल्ल होण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या अधिकाऱयांनी वर्तवली.

गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या सणाला मुंबई, ठाण्यातून कोकणातील गावी जाणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाने जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे. एसटीची सेवा खेडोपाडय़ात सुरू असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी एसटी गाडय़ांना पसंती देतात. त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मुंबई, ठाण्यातील विविध आगारांतून सुटणाऱया एसटीच्या नियमित गाडय़ांसह जादा गाडय़ांचे बुपिंग फुल्ल झाले आहे. एसटी महामंडळाने गट आरक्षणाच्या पाच हजार गाडय़ांशिवाय इतर 614 जादा गाडय़ांची व्यवस्था केली. त्यापैकी 478 गाडय़ांचे बुपिंग काही दिवसांतच फुल्ल झाले, तर उर्वरित 136 जादा गाडय़ांची काही मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत. प्रवाशांचा ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

गट आरक्षणाला आजपासून सुरुवात

वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन एसटी महामंडळाने 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान 5 हजार जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या गाडय़ांचे गट आरक्षण बुधवारपासून खुले केले जाणार आहे.