बाप्पा मोरया! एसटीच्या गणपती विशेष जादा गाडय़ांचे आरक्षण फुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटी महामंडळाने कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी सोडलेल्या जादा एसटी बसेसना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी सोडण्यात आलेल्या 2225 जादा बसगाडय़ांपैकी 1,933 बसगाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर 149 बस फेऱयांचे आरक्षण लवकरच फुल्ल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षी कोकणात गणपतीच्या सणाला जाणाऱया भक्तांसाठी मुंबई, ठाणे व पालघरमधून जादा गाडय़ा सोडण्यात येतात. त्यात संगणकीय आरक्षणाबरोबरच ग्रुप बुकिंगची सोय असते. गेल्या वर्षी सुमारे 2,100 जादा बस सोडल्या होत्या. यामधील 1,800 पर्यंत बसगाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले होते. त्याशिवाय नियमित 230 फेऱयाही फुल्ल झाल्या होत्या. यावेळी महामंडळाने 2,225 जादा बसगाडय़ा सोडल्या आहेत. 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत या जादा बसेस धावणार आहेत. यातील ग्रुप बुकिंगचे आरक्षण 1 ऑगस्टपासून आणि 9 ऑगस्टपासून संगणकीय आरक्षण सुरू झाले आहे.

– मुंबई, ठाणे, पालघरमधून 1,287 जादा बसगाडय़ांचे ग्रुप आरक्षण झाले आहे, तर 646 बसचे संगणकीय आरक्षण झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

– जादा बसगाड्यांपैकी 149 बसचे आरक्षण अजूनही सुरू असून तेही फुल्ल होत आहे. याव्यतिरिक्त नियमित धावणाऱया 245 गाडय़ाही फुल्ल झाल्या असल्यामुळे यंदा गणपती बाप्पा एसटी महामंडळाला पावला आहे.

summary :ganpati special st reservation full