राणी सावरगावच्या आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राणी सावरगाव

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील आठवडी बाजारात सोयी-सुविधांच्या अभावाकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे. येथील परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून रोगराई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांनच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे.

राणीसावरगाव येथील आठवडी बाजार हा दर मंगळवारी भरतो. या बाजारात राणी सावरगावासह सोळावाड्यांचा दळणवळणाच्या माध्यमातून संपर्क आहे. वरील बाजारात फळे, भाज्या, मिरची, कापडदुकान, किराणा, स्टेशनरी, मेडिकल, हॉटेल, मटन मार्केट, मच्छी मार्केट देशी दारू दुकान, हेअर सलून वेल्डिंग टेलर आदींचा बाजार भरतो. बाहेर गावाहून बरेचसे व्यापारी येतात. असे असले तरी येथील बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्यात जवळच वापरात नसलेले शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी यांची भर पडली आहे. गावातील अनेक सांडपाण्याचे नाले जिथे बाजार भरतो, तिथे सोडण्यात आल्यात. तसंच कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्या ढिगाऱ्यावर डुकरे आणि कुत्र्यांचा मुक्त संचार घाणीचे साम्राज्य वाढविण्यात आणखीच भर घालतो.

याच आठवडी बाजारातील विहिरीत केरकऱ्यांचे ढिगारे साचलेले दिसतात. सदरील ग्रामपंचयतीला बाजाराकडून बऱ्यापैकी उत्पन्न असले तरी सरपंच सुरेश चव्हाण, ग्रामसेवक एस.बी. तीडके यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने राणी सावरगावचा आठवडी बाजार दुर्गंधीचे केंद्र बनले आहे. ग्रामसेवक मात्र तालुक्याच्या ठिकाणी राहूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालवतात. कदाचित आलेतर काही मोजक्या लोकांना भेटून परत माघारी फिरतात. वरील प्रकारची गंभीर दखल घेऊन आठवडी बाजाराचा तत्काळ प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष भाई नामदेवराव जाधव यांनी दिला आहे.