
>> शिबी वसिष्ठ
मुंबई-पुण्यात येऊन व्यवसाय करणं ही एक आम बाब. पण खानदेशातील अंमळनेरसारख्या तालुक्यातून स्वतःचा व्यवसाय जिद्दीने उभा करणे कौतुकास्पदच.
शेळी पालन या विषयावर 97 सालापासून मी काम करत आहे. वेगवेगळ्या जातींच्या शेळ्यांच्या ब्रीड डेव्हलप करणे, पंपिंग करणे आणि त्याच्यापासून मोठय़ा प्रमाणात लेंडी खत आम्हाला मिळत होतं, मात्र फक्त रॉ लेंडी खताचा वापर केला तर ते खूप गरम पडतं आणि त्यामुळे झाडाला धोका निर्माण होतो. मुळात लेंडी खत खूप कमी मिळतं. त्याची उपलब्धता बरीच कमी आहे. त्यामुळे आम्ही या विषयावर अभ्यास करून लेंडी खत उजवणे, त्यातील तणाच्या बिया वेगळ्या करणे, त्याच्यात आलेला कचरा पूर्ण वेगळा करणे, फिल्टर करणे असं करून त्याचे पाऊच करून आजूबाजूच्यांना शेजारच्यांना, नातेवाईकांना देऊन त्यांच्या परसबागेतील झाडांकरिता ते वापरायला सांगितलं. लोकांकडून छान प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे या उद्योगाला सुरुवात झाली.
मग आम्ही आजूबाजूला म्हणजे आमच्या शंभर मीटर परिसरातल्या शेळी पालकांकडे ट्रक्टर पाठवून त्यांच्याकडील लेंडी खत गोळा करून आणायला लागलो. ते आणलेलं खत 40 ते 45 दिवस कुजवणे, त्यावर प्रक्रिया करणे अशी कामे करायला सुरुवात केली. हा व्यवसाय करण्याच्या हेतूने आम्ही ‘बागेश्री’ हा स्वतंत्र ब्रँड स्थापन केला. परसबाग, टेरेस गार्डन, किचन गार्डन, लॉन याकरिता हे खत अतिशय गुणकारी आहे. फ्लॉवरिंग प्लानकरिताही हे सुरेख आहे. त्यामुळे हा व्यवसाय छान नावारूपाला आलेला आहे.
वेबसाईटही तयार केल्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येते. लोकांना कुरियरने पाठवतो. बऱयाच ठिकाणी विक्रेते आहेत. शिवाय ज्या ग्राहकांनी आपल्या बागेतील झाडासांठी हे वापरलंय तेही हेच खत हवंय असं सांगतात. भुकटीच्या स्वरूपात आम्ही हे खत तयार करतो. भाजीपाला, फळांची चव आणि रंग नैसर्गिकच राहायला यामुळे मदत होते. याच्यामुळे जमीन भुसभुशीत राहते, हवा खेळती राहते. गांडुळांची, जैविकांची कार्यक्षमता वाढते, स्थिर राहते. जलधारक क्षमता वाढते. घरगुती कुंडय़ांमध्ये वाढ होण्याची माती ठरावीक प्रमाणात असते. त्यामुळे वाढही मर्यादित प्रमाणातच असते. त्यामुळे कुंडीतील रोपांकरिता लेंडी खत वापरले तर चांगला परिणाम दिसतो. म्हणून बागेश्री या नावानेच ग्राहक या खताची मागणी करू लागले आहेत.
उद्योगवाढीकरिता आणि घरोघरी लोकांपर्यंत या खताचे फायदे पोहोचण्याकरिता डिजिटल माध्यमाचा वापर करून आम्ही याची जाहिरात करतो. कुरियर सर्व्हिसने घरपोच सेवाही देतो. खताची प्युअरिटी मेंटेन ठेवणं ही पण एक जबाबदारी आमच्यावर उद्योजक म्हणून असते. लोकांचंही तसंच सांगणं आम्हाला आहे. हळूहळू यामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. जीवाणूंचा वापर करून नावारूपाला असलेला कॉफी उत्पादक प्रांत म्हणजे कर्नाटकातला कुर्ग वगैरे. तिथल्या लोकांनीही आम्ही तयार केलेल्या बागेश्री लेंडी खताचे नमुने मागितले आहेत. कॉफीच्या लागवडीसाठीही आता याचा वापर होऊ लागला आहे. शिवाय कोकणातही नारळ लागवडीकरिता या खताचा वापर करून प्रयोग सुरू आहेत. आम्हाला अपेक्षा आहेच कारण आम्ही शंभर टक्के आमच्या सुरुवातीप्रमाणेच उत्पादन शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत आहोत. जमिनीच्या सुपीकतेकरिता नैसर्गिक आणि सुपीक पदार्थांची खूपच आवश्यकता आहे. कारण अतोनात रासायनिक पदार्थ वापरून जमिनीची सजीवता कमी झाली आहे.
त्यामुळे समाजाकरिता एखादं छान, सुंदर उत्पादन तयार करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हळूहळू कोकणातले आंबा, नारळ, कुर्गमधली कॉफी या झाडांच्या लागवडीकरिता सध्या मागणी सुरू आहे. अशी प्रगती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी परसबाग, गच्चीतली बाग जमिनीतली रोपं याकरिताच वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेणाऱया लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे.



























































