
गोरेगाव येथील एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने तरुणीसह डिलिव्हरी बॉय जखमी झाल्याची घटना घडली. हिमानी टाप्रिया आणि राज कुमार महतो अशी जखमींची नावे आहेत. घडल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दुकानाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
गोरेगाव पश्चिम येथे एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये एक तरुणी राहते. सोमवारी तिने तिच्या कुटुंबातील एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका दुकानदाराकडून गॅसचे फुगे मागवले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास डिलिव्हरी बॉय राजपुमार हा 10 ते 12 फुगे घेऊन इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरला. तेव्हा सुरत येथील रहिवासी असलेली टाप्रिया ही तिच्या मावशीला भेटण्यासाठी गावावरून आली होती. टाप्रिया आणि राजकुमार हे दोघे लिफ्टमधून वर जात होते. राजकुमार हा टाप्रियाच्या मागे उभा राहिला. अचानक फुगे फुटल्याने ते दोघे जखमी झाले.
बर्थडे पार्टीचे फुगे लिफ्टमध्येच फुटले आणि आगीचा गोळा बनला! गोरेगाव येथील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/d3yivwMCCK
— Saamana Online (@SaamanaOnline) February 4, 2026
याप्रकरणी पोलिसांनी टाप्रिया यांचा जबाब नोंदवला. डिलिव्हरी देण्यासाठी जाताना राजकुमारला सुरक्षेचे कोणतेही उपकरण पुरवले नव्हते. घडल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 125 (निष्काळजीपणा) नुसार दुकानाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून मालकाला पोलिसांनी नोटीस दिली आहे.




























































