
हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नव्या कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पण गिलसाठी हे अजून सुरुवातीचे दिवस आहेत, त्याचे खरे कसोटीचे दिवस पुढे येणार असल्याचा इशाराही दिला. गिलने रोहित शर्माच्या जागी हिंदुस्थानच्या कसोटी संघाची कमान हाती घेतल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत प्रभावी सुरुवात केली. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सात विकेटने विजय मिळवत गिलने आपल्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली.
गंभीर यांनी गिलवर कर्णधार म्हणून कौतुकवर्षाव केला, त्याने संघाला दबावाच्या प्रसंगीही स्थिर ठेवले. मैदानावर तो शांत, पण आतून निर्धाराने भरलेला असतो हेच त्याचं सर्वात मोठं बलस्थान आहे. त्यांच्या मते गिलकडे दबाव हाताळण्याची नैसर्गिक क्षमता आहे. इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध तरुण खेळाडूंना घेऊन लढताना त्याने जो संयम दाखवला, तो एक परिपक्व कर्णधाराचे लक्षण आहे.
गंभीर पुढे म्हणाले, कोच म्हणून माझं काम त्याच्या खांद्यावरचं ओझं हलकं करणे आहे. तोपर्यंत, जोपर्यंत तो संघासाठी योग्य निर्णय घेतो आणि ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक राहतो. गिल मेहनती, पारदर्शक आणि संघहिताचे निर्णय घेणारा खेळाडू आहे. एका प्रशिक्षकाला याहून जास्त काय हवं? ते पुढे म्हणाले, गिलच्या नेतृत्वाची खरी कसोटी इंग्लंड दौऱ्यावर झाली. त्या परिस्थितीत केलेल्या धावा नव्हे, तर संघाला संकटातून मार्ग काढून देणे ही खरी परीक्षा होती. त्याने गिलच्या मानसिक ताकदीचं आणि मैदानावरील स्थैर्याचं विशेष कौतुक केलं. 25 दिवसांच्या तगडय़ा क्रिकेटदरम्यान गिलने कधीही निराशा दाखवली नाही. तो नेहमी हसत नेतृत्व करत राहिला आणि संघ एकत्र ठेवला. त्यामुळे यशाला तो पूर्णपणे पात्र आहे.