धोनीच्या खेळाने माझी बदनाम खेळी आठवली – गावसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या इंग्लंडविरुद्धच्या ३७ धावांच्या कूर्मगती खेळीवरून आता विराट कोहली आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्यापाठोपाठ लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही त्याची पाठराखण केली आहे. कठीण परिस्थतीत धोनीसारख्या धडाकेबाज फलंदाजांची मंद खेळी मी समजू शकतो. त्याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत केलेल्या खेळीने मला माझी १९७५ च्या विश्वचषकातील १७५ चेंडूंत नाबाद ३६ धावांची बदनाम खेळी आठवली ,अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपल्या स्तंभात व्यक्त केली आहे.

धोनीच्या खेळीबद्दल गावसकर यांनी लिहिलेय , इंग्लंडने दुसऱ्या वनडेत ३२२ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची मधली फळी पार कोलमडली होती. अशा स्थितीत मोठे लक्ष्य गाठताना धोनीची स्थिती मी समजू शकतो. संघाच्या विकेट भराभर जात असताना धोनीची कोंडी होणे मी समजू शकतो. अशा स्थितीत धोनीचे फटके सरळ क्षेत्ररक्षकांकडे जात होते. त्यातूनच तो दबावाखाली आला आणि अखेर बाद झाला.त्याच्या या खेळीने मला माझ्या पहिल्या विश्वचषकातील नाबाद ३६ धावांच्या बदनाम खेळीचे स्मरण प्रकर्षाने झाले.

ती कासवगती खेळी

१९७५ च्या क्रिकेट विश्वचषकात सुनील गावसकर इंग्लंडविरुद्ध १७४ चेंडूंत नाबाद ३६ धावांची खेळी खेळले होते. ७ जून १९७५ च्या त्या विश्वचषक लढतीत हिंदुस्थानला २०२ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडच्या डेनिस अँमिस याने १३७ चेंडूंत १४७ धावांची तुफानी खेळी साकारली होती. गावसकर यांच्या मंद खेळीवरून त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भडीमार झाला होता.