
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीचा परिणाम सहकार विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या सहकार आणि लेखाविषयक शासकीय पदविका (जीडीसी ऍण्ड ए) च्या परीक्षेवर झाला आहे. सहकार विभागाने चार महिन्यांपूर्वीच 23 मेपासून जीडीसी ऍण्ड एच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सहकार विभागाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
राज्यात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. प्रत्येक वर्षी त्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी जीडीसी ऍण्ड ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहकार विभागाच्या पॅनलवरील लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी पात्र उमेदवार जीडीसी ऍण्ड एच्या परीक्षेला सामोरे जातात. त्यानुसार यंदा राज्यभरातून 50 हजारांहून अधिक उमेदवारांनी सहकार विभागाकडे ऑनलाइन अर्ज भरले होते. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने 23 ते 25 मे या तीन दिवसांत सहा पेपर घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी सहकार विभागातील 80 टक्के कर्मचारी मतमोजणीच्या डय़ुटीवर जाणार आहेत. त्यामुळे 27 ते 29 मे या कालावधीत परीक्षा घेतल्या जातील, असे अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी स्पष्ट केले आहे. या बदललेल्या वेळापत्रकामुळे परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांचे इतर बाबींचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
सहकार विभागाची धावपळ उडणार
सहकार विभागाच्या निर्णयामुळे कर्मचाऱयांची मोठी धावपळ उडणार आहे. मतमोजणीचे काम संपल्यानंतर पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रासाठी नव्याने शाळेची इमारत ताब्यात घेऊन त्याचे नियोजन करावे लागणार असल्याने कर्मचाऱयांची धावपळ उडणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.



























































