
कोरोनाने संपूर्ण जगच थांबले असताना त्याचा फटका हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच देशाच्या अर्थव्यवस्थेने अक्षरशः तळ गाठला असून देशाचा जीडीपी ग्रोथ रेट -23.9 टक्क्यांवर घसरला आहे. जी-20 देशांत सर्वाधिक फटका हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. आत्मनिर्भर होता होता आत्मघात झाला आहे.
कोरोना रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. कृषि उत्पन्नाचा वृद्धी दर 3.4 टक्क्यांकर आला आहे. त्याचप्रमाणे खाण क्षेत्रात हा दर 23.3 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. उत्पादन क्षेत्रात 39.3 टक्के घट झाली असून सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून या क्षेत्राचा वृद्धी दर 50.2 टक्क्यांपर्यंत घटला आहे. एक वर्षांपूर्वी याच क्षेत्रात पहिल्या तिमाहीत हा दर 5.3 टक्क्यांनी वधारला होता.
रिझर्व्ह बँक व्याज दर कपात थांबवणार
व्यापार, हॉटेल्स, ट्रान्स्पोर्ट आणि कम्युनिकेशन क्षेत्रांत 47 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्याचप्रमाणे विद्युत क्षेत्रात 7 टक्क्यांची घट झाली आहे. हे आकडे पाहिल्यानंतर रिझर्व्ह बँक व्याज दर कपात पुढील डिसेंबरपर्यंत तरी करणार नाही.
अर्थव्यवस्थेचा नांगर बळीराजाच्या खांद्यावर
एक वर्ष आधी जीडीपीचा ग्रोथ रेट 5 टक्क्यांवर असताना कोरोनामुळे अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रानेच तारले आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर 3.4 टक्के राहिला आहे. बळीराजावरच देशाची मदार आहे.





























































