
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून पंधरा हजारांहून अधिक झाडे आणून ती शहरात लावण्याचा निर्णय सरकार तसेच महापालिकेने घेतला आहे. मात्र, त्याआधी फाशीच्या डोंगरावर मृत झाडे का लावण्यात आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. 17 हजार झाडांचा लेखाजोखा जिओ टॅगिंगसहित सगळ्या जनतेसमोर मांडावा, वेबसाईटवर प्रसिद्ध करावा. म्हणजे तुमची अंडीपिल्ली बाहेर येतील, अशा शब्दांत हरित लवादामध्ये याचिका दाखल करणारे वकील श्रीराम पिंगळे यांनी रविवारी प्रशासनावर निशाणा साधला.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात पिंगळे यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी लवादाने 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली. मात्र, तरीही सरकार, महापालिका आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून 15 हजार झाडे आणून लावण्याच्या हटवादी भूमिकेवर ठाम आहे. आज पिंगळे यांनी तपोवनास भेट देऊन पाहणी केली, पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. त्या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना या वृक्ष लागवडीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हा ‘बैल मेला आणि झोपा केला’ असा प्रकार आहे. स्थगिती मिळाल्यानंतर त्यांना जाग आलेली दिसतेय की, आता आपण झाडं लावली पाहिजेत. तुम्ही जून ते सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान जी 1270 झाडं तोडली आहेत, त्या बदल्यात तुम्ही ही 17 हजार 668 झाडं लावणार आहात, याचे निवेदन आधी प्रसिद्ध करा. फाशीच्या डोंगरावर मृत झाडे का लावण्यात आली? तिथे तुम्ही ही काळजी का घेतली नाही? याचा लेखाजोखा जिओ टॅगिंगसहित सगळ्या जनतेसमोर मांडा. म्हणजे तुमची अंडीपिल्ली बाहेर येतील. नाटक करून अचानक एक दिवस पैशांच्या जोरावर झाडांच्या गाडय़ा भरून आणणार, ती झाडं इथं टिकतील की नाही माहीत नाही. डिसेंबरमध्ये झाडे लावण्याचा हा कुठला योग आहे? अशी टीका त्यांनी केली.






























































