
वाई येथे बंगल्यात गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गिस व्हिक्टर मानका, सेबेस्टिन स्टेन मुलर या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे, तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रमांक 5मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ाची, तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करीत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.
वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील ‘विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंडय़ांमध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा व इतर साहित्य असा आठ लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गिस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टिन स्टेन मुलर (वय 25, दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान, सोमवारी (दि. 22) सायंकाळी संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरुवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱ्य़ांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 15 खोली विभागात गस्त घालत असताना, त्यांना पाहून संशयितांनी चिडून जाऊन 15 खोली विभागातील ते बंदिस्त असलेल्या खोली क्र. 5मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ाची, तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.


























































