
गेवराई येथील बहुचर्चित धन्य घोटाळा प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांची पाचावर धारण झाली आहे. एसआयटी स्थापन होण्याची गेवराई तालुक्याच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यात विशेष लक्ष घातल्यामुळे सामान्य जनतेकडून पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
बुधवारी रात्री गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पांढरवाडी रस्त्यावर एका खासगी गोडाऊनमध्ये दहा लाखाच्या जवळपास गहू तांदूळ आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुरवठा अधिकारी अशोक भंडारी यांनी भाजपा नगरसेविकेचा पति अरुण मस्के याच्यावर या घोटाळा प्रकरणी गेवराई पोलिसात तक्रार दाखल केली व गुन्हा नोंदवला. कोरोनासारख्या संकटकाळात काळात अनेक जण गरिबांच्या मदतीसाठी किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मदत करत आहेत. तर दुसरीकडे गरिबांच्या ताटातला घास काढण्याचा प्रकार गेवराई तालुक्यात उघडकीस आला.
छापेमारीत नऊ लाख 74 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल सहा ट्रकसह पोलिसांनी जप्त केला होता. तब्बल 17 तास चाललेल्या या चौकशी नंतर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी या प्रकरणाचा जलद गतीने व योग्य तपास व्हावा म्हणून गुरुवार दिनांक 7 रोजी एक विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये पोलीस उप अधीक्षक स्वप्निल राठोड पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. लवकरच फरार झालेला आरोपी अरुण मस्के यास अटक करून पुढील तपास केला जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाचा तपासून बरेच काही उजेडात येणार आहे. अरुण म्हस्के हा जिल्हा बंदी असताना कुठल्या मार्गाने फरार झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.




























































