
जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. काल हा तलाव पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागला. त्यामुळे जालना शहराचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. शहरातील जुना आणि नवीन भागाला या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा शहराच्या परिसरात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने हा तलाव भरण्यास उशीर झाला. सध्या या तलावात 18 फूट पाणीसाठा झाला असून तलाव पूर्णपणे ओसंडून वाहू लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
मागील काही दिवसापासून मुसळधार ते संततधार पाऊस सुरू असल्याने घाणेवाडी जलाशय भरणल्याचे दिसत आहे. नवीन जालन्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला असून पुढील पंधरा ते अठरा महिने जालना वासियांना पिण्याच्या पाण्याची काळजी मिटलेली आहे.
घाणेवाडी जलाशय जालना पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. या जलाशयातून झिरो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून शहरात पाणी पोहोचते. यात कोणत्याही प्रकारची वीज किंवा पाण्याची मोटर वापरली जात नाही. निजामकालीन या जलाशयाचे हे वैशिष्ट्य असून कोणत्याही प्रकारचा वीज खर्च यासाठी लागत नाही.
मागील दोन वर्षापासून समस्त महाजन ट्रस्ट मुंबई व त्यांच्यासारख्या दीडशे सेवाभावी संस्थांनी या जलाशयाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे घाणेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून पुढील अठरा महिने तरी जालनेकरांची तहान भागणार आहे हे नक्की आहे.

























































