
घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉलच्या किड्स जोनमध्ये आपल्या तीन वर्षांच्या मुलीला खेळण्यासाठी पालक घेऊन गेले. मुलगी तेथील घसरगुंडी खेळत असताना अचानक चक्कर आल्यामुळे तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्या चिमुकलीला तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
टिळकनगर परिसरात राहणारे दांपत्य त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह रविवारी नीलयोग मॉलमध्ये गेले होते. त्यावेळी मॉलमधील किड्स झोनमध्ये घसरगुंडीवर बालिका खेळत होती. खेळत असतानाच घसरगुंडीवरून खाली आल्यावर तिला अचानक चक्कर आली. मुलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या माता-पित्याने आपल्या लाडक्या मुलीला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. मुलीला दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केल्याचे पंतनगर पोलिसांनी सांगितले. पंतनगर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! मानसोपचारतज्ञांचा सल्ला
भावासोबत लपाछपी खेळताना लिफ्टच्या दरवाजातून डोकावताना एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घसरगुंडीवर खेळताना चक्कर येऊन चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घाटकोपरमध्ये घडली. या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत असून मुलांवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. मुलांना खाली खेळायला बिनधास्त पाठवा पण अधिक सजग राहा, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी पालकांना दिला आहे.
मुलांना खाली खेळायला पाठवताना पालकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी अधिक माहिती देताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आणि डहाणूच्या वेदांता इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या डीन डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या, मुलांच्या बाबतीत पालकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. आपली मुले कुठे खेळायला जातात, कुणासोबत खेळतायत, धोकादायक साधनांचा वापर तर करत नाहीत ना, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. हल्ली पालक देखील मोबाईलच्या आहारी जात आहेत. याचा मुलांवर कशाप्रकारे दुष्परिणाम होतो याबद्दल विचारले असताना डॉ. पारकर म्हणाल्या, मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे हल्ली पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होतेय. पालक आणि मुले यांच्यातील संवाद हरवतोय. काहीवेळा पालक मुलांना खाली खेळायला घेऊन जातात पण ते मुलांवर लक्ष ठेवण्यापेक्षा मोबाईलमध्येच अधिक गुंतलेले दिसतात. त्यामुळे मानसिकदृष्टया, भावनिकदृष्टया तुम्ही मुलांसोबत नाही असाच त्याचा अर्थ होतो. मुलांच्या विकासाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे. मुलांना मॉलमध्ये किंवा खेळायला घेऊन जाताना शक्यतो गरज असेल तेव्हाच मोबाईलचा वापर पालकांनी केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले आणि पालक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे, असेही डॉ. पारकर म्हणाल्या.

























































