
पूर्व उपनगर व शहर यांच्या दरम्यान वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घाटकोपरमधील लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी पात्र व्यावसायिक बांधकामे पालिकेने आज जमीनदोस्त केली. या मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱया बांधकामावरील ही दुसरी कारवाई आहे.
घाटकोपरमधील लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ व वेगवान व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या आठवडय़ात या मार्गालगतची 61 बांधकामे तोडली होती. त्या पाठोपाठ या आठवडय़ात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी तब्बल 79 पात्र व्यावसायिक बांधकामे तोडण्यात आली. गेल्या काही दिवसात व्यावसायिक स्वरुपाच्या बांधकामांवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून परिमंडळ 6चे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिकांचा काही प्रमाणात विरोध झाला, परंतु मुंबई पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी कार्यरत असल्याने कारवाई यशस्वीपणे करण्यात आली. या कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे पुन्हा बांधली जाऊ नये, यासाठी रस्ता रुंदीकरणाचे कामदेखील लगेच हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली. या कारवाईमुळे या परिसरातील लाल बहादूर शास्त्राr मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 23 फूट यानुसार रस्त्याची रुंदी 46 फूटांपर्यंत वाढवणे शक्य होणार आहे. या कारवाईत पोलिसांच्या 41 तर महापालिकेच्या 75 कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱयांनी भाग घेतला.



























































