
सामना प्रतिनीधी । मुंबई
मुरबे येथील मच्छीमारांच्या जाळय़ात सापडलेल्या घोळ माशाच्या बोथाला म्हणजेच फुप्फुसाच्या पिशवीला सोमवारी सोन्याचा भाव मिळाला. सौंदर्यप्रसाधने व शस्त्रक्रियेचे टाके घालण्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या या बोथीसाठी एका व्यापाऱ्याने चक्क साडेपाच लाख रुपये मोजले असून हा आतापर्यंतचा उच्चांक समजला जात आहे. सातपाटी, मुरबे, डहाणू, केळवे या बंदरांत घोळ, दाढ हे मासे पकडण्यासाठी वागरा पद्धतीची जाळी वापरली जाते. घोळीबरोबरच वाम, कोत, शिंगाडा या मासळीच्या बोथालाही चांगली किंमत मिळत असल्याचे येथील कोळीबांधवांनी सांगितले. उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतून पालघरात स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यांकडून नेहमीच हे बोथ खरेदी केले जातात.


























































