वाडा कोलम चमकला; जीआय टॅग मिळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कायदेशीर संरक्षण, शेतकऱ्यांचा सन्मान

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आता जगाच्या नकाशावर आला आहे. सुगंधी, रुचकर आणि पचनाला हलका असणारा वाडा कोलम तांदूळ देशविदेशातील बाजारपेठेत चमकला आहे. नाडा कोलमला जीआय टॅग (भौगोलिक मानांकन) मिळाले आहे. जीआय टॅगमुळे बनावटगिरीला आळा बसणार असून शेतकऱ्यांचा सन्मान वाढल्याने आनंदाचे वातावरण आहे. वाडा कोलमला आता खऱ्या अर्थाने कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.

वाडा तालुक्यातील जमीन व वातावरण या भाताला पोषक असल्याने तालुक्याच्या अनेक भागांत त्याची लागवड केली जाते. मुंबईतील मोठ्या हॉटेलांमधील परदेशी पाहुण्यांच्या पसंतीलाही या झिणी व सुरती तांदळाची चव उतरली. कालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. स्वत:च्या वेगळ्या ओळखीमुळे वाडा कोलमची देशविदेशातही मागणी वाढू लागली. त्याचवेळी दुसरीकडे या वाणाचे पीक घेणे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस अवघड होत गेले. संकरीत बियाण्यांचा भडीमार व कमी उत्पन्नामुळे उत्पादन कमी झाले. त्यातच अन्य राज्यातूनही वाडा कोलम नावाने बनावट तांदूळ बाजारात विकला जात होता. मात्र आता जीआय मानांकन मिळाल्याने वाडा कोलम हाच अधिकृत तांदूळ ठरणार आहे.

तीन वर्षांचे प्रयत्न फळाला

वाडा कोलम नावाने बनावट तांदळाची विक्री होऊ लागली. ही धोक्याची घंटा ओळखून वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्था, वाडा झिनिया कोलम उत्पादक सहकारी संस्थांसह किरण पाटील या शेतकऱ्याने कोलमचे भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. अखेर 29 सप्टेंबरला या मानांकनाला मंजुरी मिळाली.