
सामना प्रतिनिधी । मुंबई
गिरगाव, काळबादेवी विभागाला लवकरच सहाय्यक आयुक्त मिळू शकणार आहेत. सहाय्यक आयुक्तांची रिक्त पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. मात्र तोपर्यंत ही पदे स्टॉप गॅप अरेंजमेंटनुसार तात्पुरती भरण्यात येणार आहेत. ‘गिरगाव, काळबादेवी वाऱयावर’ असे वृत्त दोनच दिवसांपूर्वी दै. ‘सामना’ने दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तातडीने परिपत्रक काढून इच्छुक कार्यकारी अभियंते आणि उपप्रमुख अभियंत्यांकडून अर्ज मागवले आहेत.
पालिकेच्या विविध विभागांतील आणि विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत तर अनेक सहाय्यक आयुक्त येत्या काही काळामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. ‘सी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जीवक घेगडमल यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ‘बी’ वॉर्डचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अरुणकुमार शिरूरकर यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे, तर भायखळा येथील ‘ई’ विभागालाही सध्या सहाय्यक आयुक्त नाहीत. पावसाळा जवळ आल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास ही पदे रिक्त ठेवण्याचा धोका पालिका प्रशासनाला पत्करता येणार नाही. याबाबतचे वृत्त दै. ‘सामना’ने नुकतेच दिले होते. त्यामुळे आता प्रशासनाने ही पदे तात्पुरती भरण्याचे ठरवले आहे.
स्टॉप गॅप अरेंजमेंट पद्धतीने भरणार
सहाय्यक आयुक्तांची ही पदे खरे तर लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. लोकसेवा आयोगामार्फत शिफारसप्राप्त उमेदवार मिळत नाही तोपर्यंत ही पदे स्टॉप गॅप अरेंजमेंट पद्धतीने भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता या पदावर काम करण्यास इच्छुक असलेले कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता यांच्याकडून १२ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ जून रोजी या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. मात्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरली गेली की या उमेदवारांना आपापल्या जागी परत पाठवण्यात येणार आहे.
१२ पदे रिक्त
सहाय्यक आयुक्तांची १२ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ७ पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत ही पदे इच्छुक भरली जाणार आहेत. या पद्धतीनुसार यापूर्वीही पद भरती केलेली आहे.
-सुधीर नाईक, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग



























































