कलासमृद्ध वारसा; गिरगावच्या निकिताची अखंड गणेशसेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणरायाच्या  आगमनाला जेमतेम आठवडा राहिलाय. गणेशमूर्तीच्या कार्यशाळेत लगबग दिसून येत आहे. गिरगावच्या जितेकरवाडीतील कारखान्यात कामाने वेग घेतला आहे. प्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल्लचंद्र बिलये यांचा हा कारखाना असून तो 140 वर्षांचा आहे. त्यांची लेक निकिता बिलये-पडवळ गणेशमूर्ती घडवण्याच्या कामात एकदम व्यस्त आहे. यासाठी ती दरवर्षी अगदी तीन महिने माहेरी येते. गेली दहा वर्षे यात खंड पडलेला नाही.

प्रफुल्लचंद्र बिलये यांच्या ‘श्री गणपती कारखाना’मध्ये शाडूच्या मूर्ती घडवल्या जातात. प्रफुल्लचंद्र बिलये यांचे वय 75 वर्षे आहे. प्रकृतीमुळे त्यांना काम झेपत नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी आशल बिलये आणि मुलगी निकिता हे काम पाहतात. निकिता ही शेडिंग, स्प्रेगनचे काम करते. वडिलांकडून तिने हा वारसा घेतलाय. निकिताचे सासर लोणावळा येथे आहे, पण गणेशोत्सवाच्या आधी काही महिने ती गिरगावात येऊन मूर्ती घडवण्याच्या कामात स्वतःला झोकून देते.  दागिने, फिनिशिंग, रंगकाम हे बिलये यांच्या कारखान्याचे आकर्षण आहे. मूर्ती घडवण्याचे काम वर्षभर सुरू असते. दसऱयाला कामाचा मुहूर्त होतो. त्यांच्या कारखान्यात वर्षभरआधी ऑर्डर घेतली जाते.

बाप्पाच्या कामासाठी मी तीन महिने माहेरी येते. लग्नावेळीच असे ठरवण्यात आले होते. सासरच्या मंडळींचाही पाठिंबा आहे. दहा वर्षे माझ्या लग्नाला झाली आहेत. मुलीचा अभ्यास, कारखान्याचे काम असा सध्या दिनक्रम आहे.                        

– निकिता बिलये-पडवळ