गिरगाव चौपाटीवरील बोट स्टेशनची कागदावरच लटकंती, सहा महिने उलटले तरी निविदा प्रक्रिया संपेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे

‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर काही उपाययोजना करण्यात आल्या, परंतु मुंबईच्या सागरी किनाऱयावर तगडी सुरक्षा व्यवस्था नसल्याने गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. निधीदेखील मंजूर झाला, मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी हे बोट स्टेशन निविदा प्रक्रियेतून बाहेर येत नसल्याने ते कधी उभं राहणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कुलाब्यापासून वरळी सागरी सेतू व त्यापुढे पश्चिम सागरी किनारा आहे. हा संपूर्ण पट्टा अत्यंत संवदेनशील आहे. गेट वे ऑफ इंडिया, नेव्ही नगर, बधवार पार्क, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, राजभवन, हाजी अली तसेच वरळी सागरी सेतू अशी महत्त्वाची ठिकाणे या पश्चिम सागरी किनारी पट्ट्यात मोडतात. मुंबईत माझगाव आणि वांद्रे येथे सागरी जेट्टी आहे. या दोन ठिकाणांहून अख्ख्या मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी गस्त घातली जाते. त्यात गस्त नौका कमी असल्याने सुरक्षा व्यवस्था करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, पण सहा महिन्यांहून अधिक काळ झाला तरी या बोट स्टेशनसाठी मुहूर्त सापडलेला नाही.

निविदांचा खेळ

बोट स्टेशन उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी लिटमस मरीन आणि वेस्ट कोस्ट मरीन या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता, परंतु त्यांच्या निविदा मान्य न करता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे बोट स्टेशन उभारण्याचे काम लांबत चालले आहे. आधी सहभाग घेतलेल्यांपैकी एक कंपनी पात्र ठरत नसल्याने पुन्हा ही प्रक्रिया राबविली जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते.

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीमधून या बोट स्टेशनकरिता निधी मंजूर झाला आहे, परंतु कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून बोट स्टेशन लटकले आहे.
  • गिरगाव चौपाटीवर किनारपट्टीपासून आत 200 मीटरवर बोट स्टेशन म्हणजेच तरंगती जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या चार बोटी कायमस्वरूपी 24 तास तैनात ठेवण्यात येतील. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने तगरी गस्त घालणे सोयीचे होईल.