ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्यनिर्मितीच्या प्रांतात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णन, ललित लेखन, बालसाहित्य अशा सगळ्या विषयांत मुशाफिरी केलेल्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. कीर यांच्या निधनाने परखड पण तितकीच मर्मभेदी लेखिका हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शिव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरिजा कीर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.  ‘किर्लोस्कर’, ‘प्रपंच’, ‘ललना’ या प्रख्यात मासिकांतून कीर यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आणि जवळजवळ 10 वर्षे त्या ‘अनुराधा’ मासिकाच्या सहाय्यक संपादिका होत्या. ‘गिरिजाघर’, ‘देवकुमार’, ‘चांदण्याचं झाड’, ‘चंद्रलिंपी’, ‘चक्रवेद’, ‘स्वप्नात चंद्र ज्याच्या’, ‘आभाळमाया’, ‘आत्मभाग’, ‘झपाटलेला’ आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी ‘जन्मठेप’ हे पुस्तक सहा वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्काराने गौरकिण्यात आले आहे.

वास्तवाशी नाळ जुळणारे लेखन
कथाकादंबऱयांचे लिखाण करताना त्यांची नाळ वास्तवाशी नेहमीच जोडलेली राहिली. कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर लिहिले. वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत त्या देशविदेशात कथाकथनासाठी जात असत आणि त्यातून मिळणारे पैसेही पुन्हा वंचित मुलांसाठी वापरत असत.