
इतर राज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची फक्त ॲन्टीजन चाचणी करुन भाजप सरकार राज्यातील गोरगरीब जनतेचे आयुष्य धोक्यात घालत आहे. डेल्टा प्लस नावाचा नवीन व्हायरस कोकण, कर्नाटक आणि केरळमध्ये पोहोचला आहे. हा विषाणू फक्त जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे ओळखता येतो. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यात जीनोम चाचणी सुविधा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कोविडच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भाजपा सरकारने कोविड रुग्णांची हत्या कशी केली हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकार कमिशनचा वाटा ठरविण्यात व्यस्त राहिले, ज्यामुळे 3००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. दुसर्या लाटेत भीषण परिस्थिती असतानाही भाजपा सरकारचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना अद्याप याबाबत धडा मिळालेला नाही. तिसऱ्या लाटेचा सामना करायची काहीच तयारी नसल्यानेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कधीच अस्तित्वात न येणाऱ्या घोषणा करण्यात व्यस्त आहेत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे गेल्या काही दिवसांत बेपत्ता झाले आहेत, असा आरोपही चोडणकर यांनी केला. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस घेबेरियसस यांनी असा इशारा दिला आहे की कोविड -19 महामारीचा हा धोकादायक काळ असून जवळजवळ 100 देशांमध्ये अतिसंसर्गजन्य डेल्टा प्रकार आढळून आले आहेत. शेजारील राज्यांमध्ये डेल्टा प्लस पोहोचला आहे. या प्रकाराचा प्रसार लवकर ओळखून आणि नियंत्रित केला जाऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याकडे जीनोम सिक्वेंसींग चांचणी साठी स्वतःची प्रयोगशाळा असायला पहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता तरी हे त्यांच्या मनावर येऊन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम केले पाहिजे, असे चोडणकर म्हणाले.
सध्या गोव्यातून नमुने पुण्यात पाठविण्यात येत आहेत. पण त्याचा निकाल लागण्यास अधिक कालावधी लागत आहे. यामुळे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचार्यांवर ताण वाढत आहे आणि परिणामी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले. एक वर्षापूर्वी जीएमसी येथे प्रयोगशाळा स्थापन करण्याचा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचा सल्ला भाजपा सरकारने स्वीकारला असता तर अनेकांचे जीव वाचले असते. आजपर्यंत संपूर्ण चाचणी प्रयोगशाळा का स्थापित केली गेली नाही हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले पाहिजे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.






























































