3 वर्षांची मुलगी भलत्याच स्कूल व्हॅनमध्ये बसली, 2 तास बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुलुंड

चुकीच्या स्कूल व्हॅनमध्ये बसल्याने 3 वर्षांची एक मुलगी 2 तास बेपत्ता झाली होती. सगळ्या पालकांना चिंतेत टाकणारा हा प्रकार मुंबईतील मुलुंड भागात घडला आहे. 3 वर्षांची ही मुलगी श्री श्री रविशंकर या शाळेत शिकते. तिच्या आजीने तिला शाळेच्या व्हॅनमध्ये बसवलं. घरासमोर शाळेतील मुलं असलेली व्हॅन उभी राहिल्याने आजीने तिच्या नातीला त्याच गाडीमध्ये बसवलं. सोमवारी रविशंकर शाळेतील विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घालायचा नव्हता, त्यामुळे ही मुलगी चांगले कपडे घालून तयार झाली होती. सोमवारीच वाणी विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनाही युनिफॉर्म घालायचा नव्हता, त्यांनीही युनिफॉर्म व्यतिरिक्त कपडे घातले होते. यामुळे आजीला ही आपल्या नातीची व्हॅन असावी असं वाटलं होतं.

ही मुलगी शाळेत गेल्यानंतर दोन तासानंतरही घरी परत आली नाही, ज्यामुळे घरी हलकल्लोळ माजला. तिच्या आईवडिलांनी तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर त्यांची मुलगी सापडल्याचा आणि ती सुखरूप असल्याचा फोन आला. वाणी विद्यालय जी मुलुंडमधलीच शाळा आहे, त्या शाळेच्या व्हॅनमध्ये बसून ही मुलगी शाळेत पोहोचली होती. शाळेत पोहोचल्यानंतर सगळंच अनोळखी दिसल्याने ती रडायला लागली. एका शिक्षिकेचं तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर तिने तिला शांत केलं आणि गळ्यातलं आयकार्ड पाहिलं. त्यावर तिच्या वडिलांचा नंबर लिहिलेला होता. या शिक्षिकेने वडिलांना फोन करून त्यांची मुलगी सुखरूप असल्याचं सांगितलं.

स्कूल व्हॅन चालवणारा ड्रायव्हर हा नवीन होता, युनिफॉर्मची सक्ती नसल्याने सगळी मुलं साध्या कपड्यात होती. ज्यामुळे त्यालाही ही मुलगी दुसऱ्या शाळेची असल्याचं लक्षात आलं नाही. धक्कादायक बाब ही आहे की, या रविशंकर आणि वाणी विद्यालय या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येकी गाडी ही अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करत असल्याचं कळतंय. नियमानुसार विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या गाड्यांचा रंग हा पिवळा असणं गरजेचं आहे. या गाडीचा रंग पिवळा नव्हता आणि त्यावर शाळेचे नावही लिहिलेले नव्हते असे मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.