
सामना ऑनलाईन । वाराणसी
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या वाराणसीमधील सभेदरम्यान एका तरुणीसोबत काँग्रेस कार्यकत्यांनी असभ्य वर्तन करत तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपर्णा विश्वकर्मा असे या तरुणीचे नाव असून ती एक कॉलेज विद्यार्थिनी आहे. अपर्णाने ‘नमो अगेन’ लिहिलेलं टी-शर्ट घालून प्रियंका यांच्या सभेला गेली होती. टीशर्टमुळे ती भाजपची कार्यकर्ता असल्याचे समजून तिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेरले आणि तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. अपर्णाला या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मोदी चोर है’ असे म्हणण्याची जबरदस्ती केली. आपण तसे न केल्याने या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप तिने केला आहे. प्रियंका गांधी यांच्या वाराणसी दौऱ्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. वाराणसीतील अस्सी घाट येथे त्यांची सभा होती. या सभेदरम्यान अपर्णा देखील घाटावर उपस्थित होती. इथेच तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे असं तिने म्हटलंय.




























































