
राग हा आंधळा असतो, असं म्हणतात. रागाच्या भरात माणूस वाटेल ते पाऊल उचलतो. त्यामुळे कधीकधी आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. अशीच काहीशी परिस्थिती एका तरुणीवर उद्भवली आहे.
अर्जेंटिना येथील एका तरुणीने रागाच्या भरात आपल्या प्रियकरावर फोन फेकून मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. रोक्साना लोपेज असं या 22 वर्षांच्या तरुणीचे नाव आहे. तर लुईस ग्वांटे असं या प्रियकराचं नाव आहे.
लुईस हा रोक्सानाला मारहाण करत असायचा. ही घटना घडली तेव्हा देखील त्यांच्यात वाद झाले होते. वाद झाल्यानंतर लुईसने रोक्सानाला मारायला सुरुवात केली.
तिने याचा प्रतिकार करण्यासाठी लुईसवर फोन फेकून मारला. तो नेमका त्याच्या डोक्याला लागला. फोनचा तडाखा बसल्यानंतर लुईसला अस्वस्थ वाटू लागलं. तीव्र डोकेदुखी होऊ लागली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्याला डोक्यात अंतर्गत दुखापत झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रोक्सानाला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात खटला उभा राहिला आहे. दुसरीकडे रोक्सानाच्या म्हणण्यानुसार तिने स्वसंरक्षणासाठी फोन फेकला होता, जो त्याच्या वर्मी बसला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोक्सानाला शिक्षा होण्याची शक्यता आहे.































































