
बातमीदारीच्या निमित्ताने पत्रकार सतत घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असून त्यांना ’फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तामीळनाडू, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धरतीवर पत्रकारांचे लसीकरण करण्यात यावे, असेही थोरात यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना कोरोना योद्धे घोषित करून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.





























































