
कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून दारुणरीत्या पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाने 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या नव्या दमाच्या 16 सदस्यीय संघांची निवड केली आहे. यात ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श या फिट झालेल्या खेळाडूंची निवड केल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने आज जाहीर केले. तसेच दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेलेल्या डेव्हिड वॉर्नरचीही मालिकेसाठी निवड केल्याचे समोर आले आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल मार्श यांचे दीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर मॅक्सवेलला दुखापत झाली होती. तो वाढदिवसाच्या पार्टीत घसरला होता आणि त्याच्या पायाला दुखापत झाली होती. परिणामतः गेले अनेक महिने तो संघाबाहेर होता. वॉर्नरपाठोपाठ माशही डाव्या घोटय़ाच्या दुखापतीमुळे विश्रांती घेत होता. आता त्यानेही पुनरागमन केले आहे.





























































