विमान प्रवासाचे आगाऊ भरलेले भाडे परत करण्याबाबत ‘गो एअर’चा नकार

571

कोरोनामुळे रद्द झालेल्या विमान तिकिटांचे पैसे विमान कंपन्यांकडून परत केले जाण्याची शक्यता आता धूसर झालेली आहे. कंपन्यांनी प्रवाशांना पैसे परत करण्याऐवजी ‘पत हमी’ दिलेली आहे. त्यानुसार प्रवासी या रकमेचा वापर वर्षभरात करू शकतात. रक्कम परत करण्यासंदर्भात गो-एअर’ने पुनर्विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

विमान कंपन्यांकडे असंख्य ग्राहकांचे कोट्यावधी रूपये अडकून आहेत. त्यातीलच नागपूरचे हरिहर पांडे यांच्याकडे गो-एअर’च्या असलेल्या 50 ग्रुप तिकिटांचे 1,34,750/- रूपयांचा समावेश आहे. त्यांनी नागपूर ते मुंबई साठी 30 जुलैसाठी तिकीट काढल्या होत्या. कोरोनामुळे आता वर्षभर कोणीही विमानप्रवास करणे टाळणार असल्यामुळे आता रक्कम बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.

आपली रक्कम परत मिळावी म्हणून हरिहर पांडे यांनी ‘लोक शिकायत’च्या माध्यमातून केंद्रातील विविध मंत्रालयांना ‘गो एअर’ची तक्रार केलेली होती, त्यात राष्ट्रपती सचिवालय, प्रधानमंत्री कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री, कैबिनेट सचिव, नीती आयोग, हवाई वाहतूक मंत्रालय, हवाई वाहतूक महासंचालनालय, पर्यटन मंत्रालय,  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांचा समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व खासदार कृपाल तुमाने यांनी गो-एअर’ला पत्र लिहीले होते.

वरील सर्वच जनसमस्यांची दखल विमान वाहतूक मंत्रालयाने घेत महासंचालनालय कार्यालयात अधिक माहीतीसाठी पाठविली होती. जीडीसीए च्या माध्यमातून गो-एअरच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचली होती. त्या सर्व पत्रांना गो-एअर नोडल अधिकारी नेहा वर्मा यांनी पैसे परत करता येणार नाही, असे सांगितले आहे. त्याऐवजी पत हमी दिली आहे, असे पत्र हरिहर पांडे यांना पाठविले आहे. मात्र रक्कम परत करण्यासंदर्भात विमान कंपन्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या