
शनिवारी 18 जून रोजी या सर्व पंचायतींची मुदत संपत आहे. ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुका होणार असल्याने अखेर पंचायत संचालनालयाने 175 पंचायतीवर प्रशासक नेमले आहेत.
राज्यातील 186 पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षण प्रक्रियेमुळे रखडल्या आहेत. आता आठवड्यातील तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी पंचायतीत प्रशासक उपलब्ध असतील, असे संचालनालयाच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकार पंचायतींच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यासाठी आग्रही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने ओबीसी आरक्षण लागू करूनच निवडणका घेण्याचे निश्चित केले, त्यानुसार त्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही विनंती केली होती. त्यात पावसळा असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
पंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने पंचायत संचालनालयाला प्रशासक नेमण्या वाचून पर्याय राहिला नव्हता. त्यानुसार संचालनालयाने गटविकास अधिकाऱ्यांकडून पात्र अधिकाऱ्यांची यादी मागविली होती. या यादीची छाननी झाल्यानंतर आज दुपारी संचालक हळर्णकर यांनी प्रशासक नेमल्याचे आदेश जारी केले आहेत.






















































