पाच नगरपालिका निवडणुकांत भाजपचा पराभव होणार हे नक्की – दिगंबर कामत

कोविड महामारीचे संकट हातळण्यास अपयशी ठरलेल्या असंवेदनशील, बेजबाबदार व दिवाळखोर भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशात आक्रोशाची भावना आहे. जीवनावश्यक प्राणवायुच्या अभावामुळे आज शेकडो लोकांचे जीव गेले. जनतेचा राग नगरपालिका निवडणुकांच्या मतदानातून व्यक्त होणार असून आज मतदान होत असलेल्या पाच नगरपालिकांत भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिली.

समोर दिसत असलेल्या पराभवाने वैफल्यग्रस्त झालेल्या भाजप सरकारने पोलीस बळ व सरकारी यंत्रणेचा वापर करुन आमच्या समर्थकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आमच्या पॅनलच्या उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्यापासून अटकाव करण्यात आला. भाजप सरकारने सर्व मर्यादा तोडुन खालच्या पातळीवर जावून दंडेलशाहीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणे धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले.

भाजप सरकारकडून आता कोणत्याच अपेक्षा नसल्याचे गोमंतकीयांना कळुन चुकले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यास, विकास करण्यास व लोकशाहीचे रक्षण करण्यास भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकांचा रोष पाचही नगरपालिकांच्या मतदानातून व्यक्त होणार असून भाजप पॅनलचा दारुण पराभव अटळ आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या