3 किलोमीटरसाठी 2 हजार रुपयांची मागणी, गोव्यात टॅक्सी चालकांनी चालवली आहे लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हा पर्यटकांचा हंगाम असल्याने गोव्यात सर्वच गोष्टी महागतात. गोवा हे तसे महागडे शहर म्हणूनही ओळखले जाते. मात्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आलेल्या पर्यटकांची टॅक्सीचालकांनी लूट केल्याच्या घटना घडल्या आहेत. गोव्यात तीन किलोमीटरसाठी तब्बल 2000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. गोव्यात टॅक्सीचालकांकडून होणाऱ्या लुटीची पर्यटकांनी माहिती दिली आहे.

दिल्लीतील एक जोडपे नववर्षासाठी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते कंळगुट येथील एका रिसॉर्टवर थांबले होते. तेथून 3 किलोमीटरवर असलेल्या अर्पोरा-अंजुना सामेवरील नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी ते उत्सुक होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सीचालकाने त्यांच्याकडे 2 हजार रुपयांची मागणी केली. टॅक्सीचे हे भाडे ऐकून त्यांचा नाईट क्लबमध्ये जाण्याचा उत्साह मावळला. एका किलोमीटरसाठी तब्बल 600 रुपये आकारण्यात येत होते.

गोव्यात पर्यटनाचा हंगाम असल्याने सर्वच गोष्टी महाग असणार याची आम्हाला कल्पना होती. मात्र, टॅक्सी चालकांकडून मागण्यात येणारे भाडे अविश्वसनीय असल्याचे आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजन्सीमध्ये भागीदार असलेल्या मानव कपूर यांनी सांगितले. अर्पोरा येथील नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी टॅक्सीटालकाने मागणी केलेले 2,000 रुपये देण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता. नववर्षाला पहाटे 2 वाजता रिसॉर्टवर परतणे आणखी महागडे ठरले. तेथून रिसॉर्टवर परतण्यासाठी आमच्याकडे 3,500 रुपये भाडे मागण्यात आले. ट्रक्सीचालकाच्या मिनतवाऱ्या केल्यानंतर तो 3,000 रुपयांत सोडण्यास तयार झाला, असे कपूर म्हणाले. यापुढे तीन ते चार वर्षे गोव्याला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे कपूर यांनी सांगितले.

उत्तर गोव्याच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात टॅक्सीचालकांकडून पर्य़टकांची लूट करण्यात येत आहे. अनेक टॅक्सीचालक पर्यटकांशी उद्धटपणे वागत असून महिलांशाही गैरवर्तन करतात अशा अनेक तक्रारी येत आहेत. कोणताही व्यवसाय करताना नैतिकता महत्वाची असते, असे कोलकात्यातील एका महिला पर्यटकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आपल्याला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कळंगुट ते अंजुना जाण्यासाठी 2,500 रुपये भाडे सांगण्यात आले होते. आपण चालकाला दर कमी करण्यास सांगताच त्याने नकार दिला. आपण त्याला भाड्याचे पैसे देत आहोत. त्याचा ईएमआय भरण्यास मदत करत नसल्याचे आपण रागातच त्याला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की, पर्यटक गर्दीच्या हंगामात विमान भाडे आणि मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. तर ते टॅक्सीचे भाडे देखील देऊ शकतात, असे सांगत तो निघून गेला.

याबाबत टॅक्सी युनियनचे नेते लक्ष्मण बाप्पा कोरगावकर यांनी माहिती दिली. भाडे नाकारणे किंवा पर्यटकांशी गैरवर्तनाच्या कोणत्याही घटना घडल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य परिवहन संचालनालयाने पिवळ्या-काळ्या टॅक्सींच्या किंमती पहिल्या किलोमीटरवर 21 रुपयांपर्यंत मर्यादित केल्या आहेत, तर पर्यटक टॅक्सीचे दर निश्चित केले आहेत. याशिवाय, प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारले जाणार नाही,यासाठी डिजिटल भाडे मीटर बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटकांनी तक्रार कक्ष, स्थानिक आरटीओ किंवा अगदी अधिकारक्षेत्र पोलिसांकडे तक्रार करावी जेणेकरून आम्ही त्या टॅक्सी चालकांवर कारवाई करू शकू. टॅक्सीमध्ये डिजिटल भाडे मीटर बसवल्यामुळे, पर्यटकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची मागणी केली पाहिजे, असे वाहतूक उपसंचालक फ्रान्सिस वाझ यांनी सांगितले. परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो म्हणाले की, टॅक्सीचालकांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत आणि वाहतूक संचालनालय दोषींवर कारवाई करेल. आम्ही वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यासाठी डिजिटल मीटर अनिवार्य केले आहेत. असे असूनही, काही टॅक्सी चालक नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.