गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मंगळवारी मतदान

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यात मंगळवारी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले दोन महिने चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली. राज्यातील 11 लाख 35810 मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. उत्तर गोव्यात 5 लाख 56625 तर दक्षिण गोव्यात 5 लाख 79185 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यातील निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला.आता उमेदवारांना केवळ घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा राहील. राज्यात दोन दिवसांत कोणीही नेते मंडळी आलेली नाहीत. भाजपने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी नेत्यांच्या सभा घेतल्या.
लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी चुरशीच्या लढती होतील, अशी माहिती हाती आली आहे. सर्वच विधानसभा क्षेत्रांमध्ये खासदार निवडीसाठी होणारे मतदान हे चुरशीचे होईल.

उत्तर गोव्यात बार्देश व दक्षिण गोव्यात सासष्टि हे तालुके सर्वात मोठे आहेत. बार्देशमध्ये सात तर सासष्टि मध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. बार्देशमध्ये एकूण 1 लाख 91720 मतदार आहेत. जे उत्तर गोव्यातील 34.44 टक्के मतदार आहेत तर सासष्टिमध्ये आठ मतदारसंघ असून तेथील मतदारांची संख्या 2 लाख 33028 एवढी आहे. मतदारांचे हे प्रमाण 40.23 टक्के एवढे आहे.

दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा उमेदवार असले तरीही खरी लढत ही दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे. उत्तर गोव्यात भाजप उमेदवार व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा मुकाबला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी आहे. श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातील या लोकसभा मतदारसंघावर चारवेळा विजयी झालेले आहेत. 1999, 2004, 2009 व 2014 मध्ये ते विजयी झालेले आहेत तर गिरीश चोडणकर हे तसे नवखे आहेत. ते अद्याप एकही निवडणूक जिंकलेले नाहीत.

दक्षिणेत काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत मात्र केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळू शकलेले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले नरेंद्र सावईकर यांनी जनसंपर्क ठेवल्याने त्यांनी निवडणुकीत सहज सामोरे जाणे शक्य झालेले आहे. मात्र सासष्टि या ख्रिस्ती बहुल तालुक्यात भाजपला कितपत मते मिळतात यावर सारे काही अवलंबून आहे. आजवर या तालुक्यात काँग्रेसनेच प्रचंड आघाडी व एकतर्फी निवडणूक तिथे होत आलेली असल्याने भाजपसमोर हे एक मोठे आव्हान आहे.

मगोने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने उत्तर गोव्यात तुलनेत त्याचा फटका दक्षिणेत बसण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी अधिकृतपणे प्रचार संपुष्टात आला. उद्या सोमवारी मतपेटया घेऊन मतदान केंद्र अधिकारी आपापल्या केंद्रावर जाणार आहेत. दरम्यान, लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर व दक्षिण गोव्यामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. डॉ. शामाप्रसाद स्टेडियममध्ये बंदोबस्तासंबंधी पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात आले.