
गोवा मुक्ती दिनानिमित्त आज लोहिया मैदानात दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसकडून पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत म्हणाले की, “गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी मला ऐतिहासिक लोहिया मैदानावर स्वातंत्र्य संग्रामात कष्ट, हाल-अपेष्टा तसेच तुरूंगवास भोगलेल्या गोमंतभूमिच्या “पंचरत्नांचा” सन्मान करुन आशिर्वाद घेण्याची आज संधी मिळाली हे माझे परमभाग्य आहे. केवळ आणि केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या परिश्रमाने व लढ्याने आपला गोवा भारतमातेशी 19 डिसेबंर 1961 रोजी परत विलीन होऊ शकला असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
तसेच आज राजधानीत करोडो रुपयांचा चुराडा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानाने निमंत्रण देण्याचे भान सरकारला राहिले नाही हे दुर्देवी आहे. सरकारच्या या कृतीचा मी तिव्र निषेध करतो असे दिगंबर कामत पुढे बोलताना म्हणाले.
या समयी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग कुंकळयेकर, गजानान रायकर, शशिकला होडारकर आल्मेदा, गोपाळ चितारी व वामन प्रभूगांवकर यांचा दिगंबर कामत व विचारवंत दत्ता दामोदर नायक यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा क्षण आहे. स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या चरणांकडे माझा सन्मान करुन घेताना मी धन्य झालो. माझी मातृभूमि आज 60 व्या वर्षात पदार्पण करताना माझा झालेला हा सन्मान ह्रदयस्पर्शी आहे असे भावपूर्ण उद्गार पांडुरंग कुंकळयेकर यांनी यावेळी बोलताना काढले.
पंडित नेहरूंचे योगदान गोव्यासाठी खुप मोठे असुन त्यांचा पुतळा गोव्यात होणे गरजेचे आहे असे सांगुन नेहरूंबद्दल अनाकारण अपप्रचार कुणी करु नये असे दत्ता नायक म्हणाले.
आज स्वातंत्र्य लढ्यातील मी व माझ्या इतर सहकाऱ्याना सरकारने आम्हाला दिलेल्या वागणुकीने खुप वाईट वाटले. स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षपुर्तीला आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र सैनिकांनाच डावलणे हे धक्कादायक आहे. भरमसाठ खर्च करुन आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे सरकारचा वेगळाच हेतू असल्याचा संशय येतो असे पांडुरंग कुंकळयेकर म्हणाले.
पोर्तुगिजांच्या सालाजारशाही विरुद्ध आम्ही सर्व यातना सहन करुन लढा दिला. अनेकांनी आपले बलिदान दिले. परंतु, आज सरकारला स्वातंत्र्य सैनिकांना योग्य सन्मान देणे उचीत वाटत नाही. जो कार्यक्रम केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागानेच आयोजित करता आला त्याच कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण देण्याची आठवण मुख्यमंत्र्याना काल रात्री उशिरा झाली हे धक्कादायक आहे असे गजानन रायकर म्हणाले.
राज्यातील इतिहासीक स्थळे व स्मारकांची योग्य देखभाल ठेवणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, ज्या पवित्र स्थळावर डॉ. राम मनोहर लोहियांनी क्रांतीची ज्योत पेटवली ते स्थळ आज दुर्लक्षित झाले आहे. सरकारने त्वरित लोहिया मैदानाचे सुशोभिकरण करावे असे गोपाळ चितारी म्हणाले.
सरकारने अवाढव्य व अनाठायी खर्च करण्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिक, वृद्धांचे तसेच सरकारच्या मदतीवर विसंबून असलेल्यांचे मासिक पेंशन वेळेवर द्यावे. मला माझे ह्या महिन्याचे पेंशन वेळेवर मिळालेले नाही. सरकार मात्र कोटी रुपये खर्च करीत आहे असे शशिकला होडारकर आल्मेदा म्हणाल्या.
आज माझे वय 83 वर्षे असुन, जींवत असतानाच लोहिया मैदानाचे सुशोभिकरण झालेले बघण्याची एकमेव इच्छा असल्याचे वामन प्रभूगावकर यांनी बोलताना सांगितले.
दीपोत्सवात संपुर्ण लोहिया मैदान पणत्या व मेणबत्यांच्या प्रज्वलनाने उजळले होते. सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितांनी हुतात्मा स्मारक व लोहियांच्या पुतळ्याला आदरांजली वाहीली. अनिल पै यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.























































