जिल्हा पंचायतींच्या निवडणुका लोकांच्या हितासाठी पुढे ढकलल्या: मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोरोना व्हायरसविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात 24 मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका अनिश्चत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रचार संपला असून आता फक्त मतदान आणि मतमोजणीची तारोख जाहीर होईल,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी बाबत झालेल्या चर्चे नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसला तरी सरकारी यंत्रणा सज्ज आहे.1 ली ते 8 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून 10 वी आणि 12 वीच्या 21 मार्च पासून होणाऱ्या परीक्षा अनिश्चत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 9 वी आणि 11 वीच्या परीक्षा बाबत 31 मार्च रोजी आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करणे आणि सीमा सील करण्यासारखे निर्णय सध्या तरी घेतलेले नसले तरी भविष्यात परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोव्यातील लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय कुठे प्रवास करू नये आणि गोव्या बाहेरील पर्यटकांनी गोव्यात येणे टाळावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. जे गोमंतकीय महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून गोव्यात येणार आहेत त्यांनी गोव्यात आल्या नंतर स्वेच्छेने गोमेकॉत जाऊन तपासणी करून घ्यावी आणि गरज असेल तर क्वारंटाइन व्हावे,अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.