घर बांधणी योजनेवरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका – गोवा फॉरवर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सरकारने बंद केलेली घरबांधणी योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारी कर्मचाऱ्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केला आहे. सावंत यांचा हेतू स्पष्ट असेल तर शुक्रवारपर्यंत ही योजना सुरु करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र दाखल करावे असेही त्यांनी म्हटले आहे.

मोहनदास लोलयेकर यांनी बुधवारी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत सांगितले की, सरकारी कर्मचार्‍यांची मते गमावण्याच्या भीतीने भाजपने हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. भाजप सरकारनेच ही योजना बंद केली होती आणि यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.

कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सावंत यांनी राजकीय खेळी केली आहे. प्रमोद सावंत यांनी केलेली ही निवडणुकीसाठीची घोषणा आहे. ही योजना बंद केल्याने 1400 सरकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले असून अनेकांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. आता फक्त मते मिळवण्यासाठी सावंत आपल्याला त्यांची काळजी आहे असे दर्शवित आहे.’’ असे लोलयेकर म्हणाले. नव्या योजनेंतर्गत पाच टक्के व्याज सरकार उचलणार आहे, तर कर्मचाऱ्यांना दोन टक्के व्याज भरावे लागणार असल्याचे सावंत यांनी जाहीर केले आहे.

या विषयावर त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. ही योजना पुन्हा कधी सुरू होईल हे त्यांनी सांगावे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की जर सरकारचा हेतू स्पष्ट असेल तर त्यांनी न्यायालयाला सांगितले असते की ते योजनेची पुनर्रचना करत आहे आणि याचिकाकर्त्यांना खटला मागे घेण्यास सांगितले असते. या प्रकरणात असे काहीही झालेले नाही. त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे लोलयेकर म्हणाले. आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते आणि त्यामुळे भाजप नंतर म्हणेल की ते योजना सुरू करू शकले नाहीत, असेही ते म्हणाले. त्यामुळे ही योजना शुक्रवारपर्यंत सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.