
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील तुये येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा चिरेखाणीत बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजता घडली. या चौघांचे मृतदेह सापडले आहेत. हे विद्यार्थी नववी व सातवीच्या वर्गात शिकत होते.
शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास हायस्कूलच्या मागे एक किलोमीटर असलेल्या चिरेखाणीत हे विद्यार्थी आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यातील चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलीस व पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. परंतु अग्निशामक दलाकडे अंधारात पाण्यात उतरणारी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नौदलाच्या जवानांना बोलविण्यात आले. मात्र रात्री येण्यास त्यांनी नकार दिला. आमदार दयानंद सोपटे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन पर्यटन खात्याच्या आपत्तकालीन यंत्रणेला बोलाविले. रात्रीचे उशिरापर्यंत ती यंत्रणा न आल्याने शेवटी पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले.
तुयेतील दुसरी तर पेडणेतील चौथी घटना
या पूर्वी तुये येथील याच खाणीमध्ये बुडून पालये येथील एक विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. शनिवारी तुये येथील दुसरी मोठी दुघर्टना आहे. 2008 साली मांद्रे-पार्से सीमेभागात असलेल्या चिरे खाणीत कोरगाव येथील दोन विद्यार्थी पोहायला गेले होते. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला होता. तर काही महिन्यानंतर पार्से येथील एक फुटबॉलपटूने फुटबॉल खेळून आल्यानंतर आंघोळीसाठी चिरेखणीत उडी मारली, मात्र तो आतल्या चिखलात रुतल्याने वरती आलाच नाही. चिरेखाणीत बुडण्याच्या पेडणे तालुक्यात चार घटना घडल्या तरीही प्रशासनाला जाग आली नाही.





























































