गोव्यात आजपासून आयएसएलचा धमाका, 11 संघांमध्ये जेतेपदाची झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात मार्च महिन्यापासून कोरोनामुळे खेळ बंदच होते. काही कालावधीनंतर हळूवारपणे सरावाला सुरुवात झाली. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. क्रीडा क्षेत्रही पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत आहे.

हिंदुस्थानात मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच मोठी स्पर्धा उद्यापासून खेळवण्यात येणार आहे. इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारपासून गोव्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 11 संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. बायोबबल अर्थातच सुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेच्या लढती तीन स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. आयएसएलच्या या मोसमात 115 लढतींचा थरार तमाम फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळणार आहे. एटीके मोहन बागान-केरळा ब्लास्टर्स या लढतीने या मोसमातील लढतींचा श्रीगणेशा होणार आहे.

82 प्रांतांमध्ये थेट प्रक्षेपण
z हिंदुस्थानातील आयएसएल स्पर्धा वर्षागणीस प्रगती करताना दिसत आहे. या वर्षी जगभरातील 82 प्रांतांमध्ये या स्पर्धेतील लढतींचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. ‘ईएसपीएन’, ‘फॉक्स स्पोर्टस्’, ‘वन प्ले स्पोर्टस्’, ‘यप टीव्ही’, ‘डीजीसेल पीएनजी’ यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली असून यांच्याद्वारे लढतींचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणारे संघ
– एटीके मोहन बागान
– बंगळुरू
– चेन्नईयन
– ईस्ट बंगाल
– गोवा
-हैदराबाद
– जमशेदपूर
– केरळा ब्लास्टर्स
– मुंबई सिटी

– नॉर्थ ईस्ट युनायटेड
– ओडिशा