दुचाकीच्या वादातून मालकाचा खून, अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना वार्ताहार । पणजी

मंगळवारी पहाटे कांदोळी येथे हॉटेल व्यावसायिक विश्वजीत सिंह यांचा खून करून गदग-कर्नाटक येथे पसार झालेल्या दोघा संशयितांच्या मुसक्या १२ तासाच्या आत आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. बामनवाडो-कांदोळी येथील सन अॅण्ड सँडच्या पार्किंगच्या जागेत पहाटे दोन तरुणांनी तलवार आणि चाकूने वार करून मूळ दिल्ली येथील आणि गोव्यात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या विश्वजीत सिंह यांची हत्या केली होती. चाकू आणि तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंह यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.

कांदोळीत खून झाल्याची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी सेराफिन डायस आणि कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांपैकी एकजण नेरुल येथे राहणारा उमेश राठोड असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या हल्लेखोराची मात्र ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी राठोडची माहिती काढली तेव्हा तो मुळचा गदग-कर्नाटक येथील असून ३ वर्षांपासून सिंह यांच्यासाठी काम करत असल्याची माहिती मिळाली.

प्रत्यक्ष साक्षीदार आणि तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे राठोड हा गदग परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. चौधरी यांनी लागलीच गदगचे पोलिस अधीक्षक संतोष बानू यांच्याशी संपर्क साधून त्यांना राठोड आणि त्याचा साथीदार दयाशंकरची माहिती दिली. गोवा पोलिसांच्या माहितीच्या आधारे गदग पोलिसांनी उमेश आणि दयाशंकरच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक गदग येथे रवाना झाले आहे.

दरम्यान, उमेशने सिंह यांची दुचाकी न विचारता नेली होती. ती आणून न दिल्याने सिंह यांनी उमेश विरोधात कळंगुट पोलिसात एफआयआर नोंदवली होती. त्यानंतर दोघांमधील भांडणाचे पर्यावसन खुनात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.