
सामना प्रतिनिधी। पणजी
केरये-खांडेपार येथे फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आमचे अभियंते दुरुस्ती कामावर लक्ष ठेवून आहेत.परवा सायंकाळ पर्यंत पणजी मधील पाणीपुरवठा सूरळीत होईल,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
अग्निशमन दलाच्या ताफ्यातील वाहनाच्या उद्धाटन सोहळ्यास मुख्यमंत्री आले होते. यावेळी त्यांनी पाणी समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. बांधकाम खात्यातर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कोणी चिंता करण्याची गरज नाही. बांधकाम खात्याशी संपर्क साधल्या नंतर टँकर उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केरये-खांडेपार येथे गुरुवारी जलवाहिनी फुटल्यानंतर तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बांधकाम खात्याच्या टँकर मधून सगळीकडे पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्यासाठी लोक बाजारातून बॉटल बंद पाणी खरेदी करणे पसंत करत आहेत.































































