
गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारमधून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणाऱ्य़ा चालकासाहित आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गोवा बनावटीची 34 हजार 320 रुपये किमतीची दारु व वाहतूकीसाठी वापरलेली इनोव्हा कार असा सुमारे 18 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई बुधवारी रात्री करुळ चेक नाक्यावर करण्यात आली. चालक अरिंवद सैखया रमय्या व कन्हैयालाल अग्रवाल यांच्यावर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वैभववाडी पोलिस उपनिरीक्षक पी. आर. देसाई तसेच एस. ऐ. तांबे, ए. एस. मोरे यांनी करुळ चेक पोस्टवर नाकाबंदी दरम्यान रात्री 3 च्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे जाणारी इनोव्हा कार तपासणीसाठी थांबवली. पोलिसांना संशय आल्यामुळे गाडीची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या महागड्या दारुच्या 15 बाटल्या पोलिसांना सापडल्या.
तब्बल 34 हजार 320 रुपये किमतीची दारु पोलिसांनी जप्त केली. तसेच इनोव्हा चालक व त्याच्या साथीदाराला गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देसाई करीत आहेत.


























































