
गोदाकाठच्या गावांच्या मानगुटीवर संकटाची तलवार नेहमीच कायम असते. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना गोदाकाठच्या गावांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये मग पूरस्थिती असो किंवा अवैधरित्या वाळू उपसा करणारी यंत्रणा त्यामुळे होणारे अपघात आणि गोदाकाठच्या पुरामुळे होणारे नुकसान यामुळे गोदाकाठच्या गावांना रात्रंदिवस संकटांचा सामना करावा लागतो. गेल्या पंधरा वर्षापूर्वी गोदावरीला महापूर आला आणि गोदाकाठच्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकांना जीव गमवावा लागला होता. पुन्हा एकदा गोदाकाठ पूरपरिस्थिचा सामना करत आहे.
गोदाकाठचे राजापूर, गोंदी, पाथरवाला, संगमजळगाव, राक्षसभुवन, तपे निमगाव या प्रमुख गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. राक्षसभुवनचे शनि मंदिर, दत्त मंदिर, पांचाळेश्वर पुराच्या पाण्याखाली गेले. पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने गोदाकाठच्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. नदीकाठील गावे दिवसरात्र भयभीत आहेत.
गेवराई तालुका म्हटले की, समोर उभा राहतो संपन्न गोदाकाठ. तालुक्यातील 49 गावांना या गोदाकाठचा पावन स्पर्श लाभला. पवित्र गोदाकाठ मात्र गेवराईकरांसाठी वरदान ठरण्याऐवजी अलिकडच्या काही वर्षात शाप ठरू लागले आहे. गेवराई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. गोदावरीचे पात्र तुडुंब भरले आणि त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेला, अनेकांचे संसार उपयोगी वस्तू उद्ध्वस्त झाल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला, तलाव फुटल्याने जमिनी खरडून गेल्या, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर पावसाचा जोर कायम राहिल्यास 15 वर्षांपूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तीच परस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते.
ज्या गोदाकाठच्या गावात 15 वर्षापूर्वी पुराने हाहाकार माजवला होता अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, ज्या गावात ज्या मातीत आपले उभे आयुष्य घातले त्या मातीमध्ये या पुराने काही जणांचे आयुष्य मातीत गेली होते. पुराने हाहाकार माजवला होता. त्या कुटुंबांच्या पूर्वजांच्या स्मृतीच्या खाणा-खुणा मिटल्या होत्या, अनेकांना आपले घरदार, शेती सोडून जावे लागले होते. तो आक्रोश आणि किंकाळ्या आजही कानात घुमत आहेत.
त्या पुराची आठवणी जागृत होतात गोदावरीचे पात्र असे पुन्हा तुडुंब भरल्यानंतर या आठवणींना उजळणी करताना अक्षरशः अनेक गावकऱ्यांचे कंठ दाटून आल्याचे विदारक चित्र आजही गोदाकाठच्या गावात दिसून आले आहे. ही झाली पावसाळ्यातील पूरपरिस्थितीची विदारक परिस्थिती, संकट केवळ चार महिन्यातच नसतात तर उर्वरित आठ महिन्यामध्ये गोदावरीच्या पात्रात बेसुमार दिवसरात्र वाळूचा उपसा होत असताना आसपासची गावं संकटाच्या दबावात असतात. आजपर्यंत गोदा पात्रातून करोडो रूपयांची वाळू विक्री झाली. ठेकेदार मालामाल झाले, या वाळू माफियांमुळे गोदाकाठावर अनेकांचे खून झाले. वाळूच्या भरधाव वाहनांमुळे अपघातात अनेक तरूणांचा बळी गेला आहे.
























































