गटारी, औद्योगिक आणि रासायनिक सांडपाणी नदीत, दक्षिणकाशी गोदावरीच्या पाण्यावर मृत माशांचा खच

दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱया गोदावरी नदीच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील गटारी, औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी गोदावरीच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे हिंगणी बंधाऱयापासून पुढे नदीचे पाणी हिरवंगार झालं आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, नदीपात्रात मेलेल्या माशांचा खच पडला आहे. प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गोदावरी नदीच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने गोदावरी नदीवरील मोठा पूल ते शहरातील लहान पूल परिसरातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गोदावरीतील माशांचा मृत्यू कशामुळे झाला, गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण महामंडळ नेमके कोणते काम करीत आहे, असा सवाल विचारला जात आहे.

ठिकठिकाणी बंधारे घातल्यामुळे थांबून राहिलेल्या पाण्यात दरवर्षी गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. शहरातील गटारातून येणारे दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, आता पाण्यावर मृत माशांचा खच पडला आहे. दरम्यान, नदी प्रदूषणामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. गोदावरीच्या साठलेल्या पाण्याला गटार गंगेचे स्वरूप आले आहे. पाणी काळपट आणि हिरवेगार दिसत आहे. प्रदूषण रोखण्यात महामंडळ पूर्ण अपयशी ठरले असून, प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

त्वचारोगाची भीती

गोदावरी नदीला डबक्याचं स्वरूप आले असून, नदीतील पाणी जनावरांना पिण्यालायकही राहिलेले नाही. काही धार्मिक प्रवृत्तीचे लोक गंगा गोदावरीला पवित्र समजून त्याच पाण्यात स्नान करीत आहेत. त्यामुळे अनेकांना त्वचारोगासारखे असाध्य रोग जडत आहेत. सध्या विविध गावांत यात्रांची पर्वणी सुरू आहे. दूरवरून अनेक भाविक देवाला पाणी नेण्यासाठी कोपरगावात येतात. मात्र, प्रदूषित झालेले पाणी नेण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.