
सामना ऑनलाईन । मुंबई
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को.- ऑप सोसायटी लिमिटेडच्या मुंबई येथील शाखेचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची गोदावरी जगभर पसरू दे अशा शब्दांत सोसायटीचे अध्यक्ष, संस्थापक आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले.
नांदेड येथून सुरुवात करण्यात आलेल्या या क्रेडिट सोसायटीचे संस्थापक आमदार हेमंत पाटील असून अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील या आहेत तर व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आहेत. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, नोकऱ्या मागणारे नको तर नोकऱ्या देणारे बना. स्वतःचा लघुउद्योग का होईना सुरू करा, तरच तुम्ही आणखी दहा जणांना उभे कराल. अनेकदा भांडवल आणायचे कुठून असा प्रश्न उभा राहतो. अशा गरजूंना गोदावरी क्रेडिट सोसायटी मदत करत आहे. माझा शिवसैनिक इथपर्यंत मजल मारू शकतो आणि केवळ मजल नाही तर फेरीवाले, चित्रपट व्यवसायातील लोक, आणखी काही क्षेत्रातले लोक यांनाही उभे करतो आहे. याचा अभिमान असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. नागपूरपासून मुंबई आणि आता न्यूयॉर्कच नाही जगभरात तुमचे नाव करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नेत्यांना सोसायटी चालवणे कठीणच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोसायटीचा एनपीए कमी असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महिला बचत गटाला कर्ज देण्याबद्दलही त्यांचे कौतुक केले. नेत्यांना अशा सोसायटी, चालवणे कठीण असते. कारण लोक म्हणतात, कर्जे दिली नाहीत तर मते मागायला कशाला येता.अनेकांना तर कर्जे द्यावीत पण वसुलीसाठी येऊ नये असे वाटत असते. अशा परिस्थितीत गोदावरी क्रेडिट सोसायटीने उभे राहून दाखवले तसेच एनपीएही कमी ठेवला असेही मुख्यमंत्री म्हणाले. सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

























































