‘ती’चे दागिने

संजीवनी धुरी-जाधव,[email protected]

अंबाबाईचा उदो उदो… असे म्हणत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीचा साजशृंगार हा अत्यंत देखणा आणि लोभस असतो. तिच्या शृंगाराविषयी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचे खजिनदार (हवालदार) महेश खांडेकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

देवीची कुंडले…देवीच्या कानातील कुंडलांवर हिरे, माणिक, पाचू आहेत. किरीट…देवीचा किरीट हा सोन्याचा असून आकर्षक आणि सुंदर आहे, तो रत्नजडित आहे. पान…किरिटाच्या वर सोन्याचे पान घातले जाते. ठुशी….ही देवीच्या कंठाभोवती घातली जाते आणि ती फार आकर्षक दिसते. चंद्रहार…हा चंद्रहार शाहूकालिन आहे. तो पाचशे ग्रॅम वजनाचा असा आहे.

मोहराची माळ….ही माळ आदिलशाहकालिन आहे. त्याच्या मोहरावर आदिलशाह असे नाव असून. त्या माळेमध्ये एकोणपन्नास मोहरा आहेत. चिंचपेटी…ही गळ्याजवळ माळ घातली जाते. ती हिरे, माणिक, पाचूपासून बनलेली आहे, लप्पा…देवीचा किरीट, कुंडल, नथ आणि त्याबरोबर लप्पा असा सेट आहे. म्हाळुंग…हे देवीचे आवडते फळ आहे. त्यामुळे देवीच्या दगडी मूर्तीत हातात म्हाळुंग फळ आहे. त्यावर सोन्याच्या म्हाळुंग फळाचे कवच केले आहे.

मोरपक्षी….देवीच्या कपाळाच्या दोन्ही बाजूला लहान मोरपक्षी असतात. मंगळसूत्र…हे देवीच्या नियमित गळ्यात असतं. ते कधीच उतरवले जात नाही. सगळे दागिने बदलले जातात. पण मंगळसूत्र तेच असते. कवडय़ांची माळ…ही शिवकालीन माळ आहे. नथ…देवीची नथ हिरे, माणिक, पाचू आणि मोती असलेली आहे, पादुका…देवीच्या  पायात सोन्याच्या पादुका आहेत. सातपदरी कंठी…ही कंठी खऱया मोत्यांची आहे. चार पदरी कंठी…ही कंठी अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. पेंढः हा दुर्मिळ दागिना असून तो पूर्णपणे मोत्यांचा  आहे. त्याच्या मधोमध पाचू आहे. कृष्णा लॉकेट…साठ-सत्तर वर्षापूर्वीचे हे लॉकेट आहे. एका भक्ताने हे लॉकेट दिले होते. तेव्हा त्याने देतानाच हे कृष्णा लॉकेट असल्याचे सांगितले होते आणि तेच नाव पुढे लावण्यात आले. हे लॉकेट सोन्याचे असून त्यावर अमेरिकन खडे आहेत. बोरमाळ…ही पाचपदरी सोन्याची माळ आहे. त्याच्या लॉकेटमध्ये हिरे आहेत. लहान बोरांच्या आकारातली ही माळ आहे. बाजूबंद…हे देवीच्या दोन्ही हाताच्या बाजूबंदात घातले जातात. ते सोन्याचे आहेत. गदा…देवीच्या उजव्या हातामध्ये मागे एक सोन्याची गदा आहे. पुतळ्याची माळ…ही माळ अत्यंत देखणी असून 21 पुतळ्याची आहे. त्यावर 21 कमळावर बसलेल्या लक्ष्मीचे छाप आहेत. तोडे…देवीच्या पायातील तोडे सोन्याचे आहेत. पादुका…देवीच्या सोन्याच्या पादुका आहेत. कोल्हापूरी साज …देवीचा कोल्हापूरी साज हा अत्यंत देखणा आहे. हा साज बेलाचे पान, शंख, चंद्र, कमळ या हारामध्ये आहे.

पंचधातूच्या मूर्तीचे दागिने

नवरात्रौत्सवात देवीच्या मोठय़ा मूर्तीबरोबर लहान पंचधातूची मूर्ती असते. ती पालखीत बसवली जाते. त्या पालखीत दीड-ते दोन फुटी पंचधातूची देवीची मूर्ती असते. नऊ दिवस रात्री 9.30 वाजता पालखी असते. त्याच्या पाठीमागे चांदिची प्रभावळ आहे. या मूर्तीचे दागिने वेगळे आहेत. यामध्ये जडावाचे हिरे, माणिक, पाचूपासून तयार केलेले लहान किरीट आहे. तसेच हिरे, माणिक, पाचू असलेली दोन कुंडले आहेत. देवीचे एक वाटीचे मंगळसूत्र आहे. यामध्ये काळे मणी लहान दोऱयामध्ये वाटीला हिरे, माणिक आहेत. त्यामध्ये लाल मण्यांची कंठी आहे.त्यामध्ये माणिक आहेत. लहान सोन्याची ठुशी आहे. बोरमाळ, लहान चाफेकळीचा हार आहे, लहान पुतळेची माळ आणि लहान कोल्हापूरी साज आहे. दोन पदरी नेकलेस असून त्यात लहान लॉकेट आहे. या लहान मूर्तीला हे दागिने घातले जातात.

 

आपली प्रतिक्रिया द्या