गोकुळची सत्ता कोणाकडे? आज होणार फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यंत चुरशीने 99.78 टक्के आणि तब्बल सात तालुक्यांत शंभर टक्के मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची सत्ता कोणाकडे यांचा फैसला उद्या मंगळवारी होणार आहे. रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी मतदान केंद्रावर मतदारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करून सत्तेचा दावा केला आहे, पण 3 हजार 639 मतदारांनी कोणाच्या पारडय़ात मत टाकले आणि क्रॉस व्होटिंगचा फायदा कोणाला होणार याचेही चित्र यातून स्पष्ट होणार आहे.

गावागावात, खेडय़ापाडय़ात रुजलेल्या आणि जिल्ह्याची प्रमुख आर्थिक नाडी असलेल्या गोकुळ दूध संघाची सत्ता आजपर्यंत जिल्ह्यातील राजकारणाचेही प्रमुख केंद्र ठरले असून, अनेक मातब्बर नेते आणि त्यांच्या वारसदारांची सोय बनले आहे. दोन हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या या संघाचा लौकिक ‘एकवेळ आमदारकी नको, पण गोकुळचा संचालक करा’ असाच राहिला आहे. त्यामुळेच अनेक आजी-माजी आमदार गोकुळचे संचालक होण्यासाठी धडपडताना दिसतात. गेल्या 25-30 वर्षांपासून गोकुळची सत्ता काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या ताब्यात राहिली आहे. संचालकांचा मनमानी कारभार, स्वतःच्या अलिशान वाहनांसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी यामुळे हा संघ अलीकडेच चर्चेत आला होता.

पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात राजकीय वैमनस्य निर्माण झाल्याने ‘गोकुळ’ला सतेज पाटील यांच्या रूपाने एक प्रबळ विरोधीगट मिळाला. यातूनच सत्ताधाऱयांचा ‘मल्टिस्टेट’चा डाव उधळण्यात यश आले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांनी एकटय़ानेच सत्ताधारी पॅनलची चांगलीच दमछाक केली. तीन संचालक निवडून आणले, इतर संचालकांच्या विजयात अवघ्या शंभर-दीडशे मतांचा फरक पडला होता. आता सतेज पाटील यांच्यासोबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक अशी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच आहे. याच जोरावर त्यांनी साडेतीन हजारपैकी अडीच हजारांहून अधिक मतदारांना एकत्रित करून ‘गोकुळ’च्या सत्तेत यंदा दावा केला आहे.

सत्ताधारी गटाकडून आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सत्यजित पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके आदीनी पुन्हा हा संघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचाही पाठिंबा मिळवला आहे. निवडणूक प्रचारात तर टँकर घोटाळा ते बाप काढण्यापर्यंत एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात आले. मतदानापर्यंत सर्व मतदारांशी संपर्क साधून दोन्ही बाजूंनी या मतदारांना सहलीवरही नेले. त्यांची सर्व हौसमौज भागवून शक्तिप्रदर्शनात मतदान केले. त्यानंतरही दोन्ही बाजूंनी सत्तेसाठी दावा करण्यात येत असेल, तर कोणाचे मतदार फुटणार? कोण क्रॉस व्होटिंग करणार? कोण दिलेला शब्द फिरवणार? हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.

विजयी मिरवणुका काढण्यास बंदी; प्रसंगी गुन्हे नोंदवणार!

रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय शासकीय गोदामात गोकुळची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी अशा 74 जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. येथे गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर याचे काटेकोरपणे पालन उमेदवारांसह, समर्थकांनी करावे, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे, तसेच शहरासह जिल्ह्यात विजयी मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.