
उत्तर प्रदेशच्या काजीपुरा गावात मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. या खोदकामादरम्यान रविवारी जमीनीत एका मातीच्या भांड्यात ठेवलेले करोडे सोने सापडले आहे. गावकरी या ठिकाणी मंदिराच्या उभारणीसाठी खोदकाम करत होते. त्यावेळी मातीच्या भांड्यात सुमारे चार किलो वजनाचे सोन्याचे दागिने सापडले आहे. त्यांची किंमत करोडोच्या घरात आहे. मंदिराचे खोदकाम करताना गुप्तधन सापडल्याचे वृत्त परिसरात आणि आजूबाजूच्या गावात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
परिसरात बघ्यांची गर्दी वाढल्याने गावकऱ्यांनी पोलीस आणि प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. महसूल विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासणीला सुरुवात केली आहे. घटनास्थळी सापडलेले दागिने सोन्याचे असल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. हे दागिने प्राचीन काळातील असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या दागिन्यांमध्ये दोन हार, काही बांगड्या आणि इतर दागिने आहेत. हे सुमारे चार किलोचे दागिने असून त्यांची किंमत काही कोटी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर प्राचीन काळातील सोन्याचे दागिने बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती. परिसरात गुप्तधनाचे वृत्त पसरल्याने काही गावकऱ्यांनी आसपासच्या परिसरातही खोदकाम केले. मात्र, तेथे काहीही सापडले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. हे दागिने प्रशासनाने ताब्यात घेतले असून पुढील तपासणी सुरू आहे.



























































