
गोव्यातील दाबोळी विमानतळावर रविवारी सव्वा कोटींचे सोने जप्त करण्यात कस्टम विभागाला यश आलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी कस्टम विभागाने पुन्हा एकदा सोने तस्कराला अटक करत त्याच्याकडून 57 लाख 67 हजार रूपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी र्नाटकातील भटकळ येथील हवाई प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
गोव्यातील कस्टम विभागाने रविवारी सकाळी एक कोटी 11 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने विमानातील शौचालयातून जप्त केले होते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी केलेल्या कारवाईत कस्टमच्या पथकाने 57 लाख 67 हजार रूपये किंमतीचे सोने भटकळ येथील हवाई प्रवाशाकडून जप्त केले. हा प्रवासी ओमान एअरवेजमधून दुबई ते गोवा व्हाया मस्कत असा प्रवास करून आला होता. विमानतळातून बाहेर पडत असताना झालेल्या तपासणीत त्याच्याकडे हे सोने सापडले. हे सोने त्याने आपल्या बॅगेमध्ये लपवले होते आणि या सोन्याचे वजन दीड किलो 38 ग्रॅम आहे. हे सोने बिस्किटाच्या स्वरूपात असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुप्त माहितीनुसार झाली कारवाई
दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने उतरविले जाणार असल्याची माहिती विमानतळावरील कस्टम विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हाय. बी. सहारे, श्रीमती ज्युलिएट व संयुक्त आयुक्त प्रज्ञशील जुमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोवा कस्टम आयुक्त मिहिर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोवा कस्टम विभागाने एप्रिल 2019 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत दाबोळी विमानतळावर 3 कोटी 43 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त केलेले आहे.
























































